
राजकारण आणि मनोरंजन ही दोन्ही क्षेत्र एकमेकांशी निगडीत आणि जनतेवर तितकाच प्रभाव टाकणारी असतात. त्यासाठीच राज्यपाल, राष्ट्रपती नियुक्त उमेदवारात मनोरंजन, साहित्य कलाक्षेत्राला प्राधान्य देण्याचा नियम आहे. मात्र कलाकारांच्या जागाही ‘राजकीय कलाकार’ व्यापून टाकतात आणि कलाकारांना आपल्याकडे असलेल्या सेवाभावी वृत्तीचा उपयोग करुन घेण्यासाठी तितकीशी चांगली संधी मिळत नाही. ‘राजकारण गचकरण’ अस आपण म्हणतो पण आता त्याही पलीकडे जाऊन सध्या वर्तमानात जे अराजकी थैमान समाज माध्यमातून आणि विविध माध्यमातून, जी बघतो, ऐकतो, ते पाहता मनोरंजनाचा जादा डोस झाल्याचे दिसते.
ज्याप्रकारे काही मंडळी विरोधासाठी विरोध म्हणून बोलतात, काही मंडळी उगाचच बोलतात तर, काही लोक आपल्याला समाज माध्यमात टीआरपी आहे म्हणून बोलतात! त्यातही अनेक भाग पडतील. विचारपूर्वक बोलणारे, विशिष्ट भूमिका घेऊन बोलणारे, घाईने कोणत्याही विषयावर बोलणारे. यात थोड्या काळात एकदम चमकण्याची स्वप्न पाहून कोणत्याही पातळीवर जाऊन बोलणारे व्यक्त होणारे दोन्ही क्षेत्रात वाढलेले आहेत! आपल्याला चित्रपट नाटक मालिका या माध्यमातून दिसणारे कलाकार हे आता समाज माध्यमातून हवे तसे, हवे तेव्हा व्यक्त होताना दिसतात आणि मग त्याची बातमी होते. या सगळ्या प्रक्रियेत आपण काय बोलावं कसं बोलावं कुठे बोलावं आणि किती बोलावं कसं अभिव्यक्त व्हावं याचं भानही काही मंडळींना उरत नाही. हा आदर्श त्यानी राजकीय क्षेत्रातील सध्या शायनिंग चे पेवफुटलेल्या लोकांचा घेतलेला दिसतो, अभिव्यक्तिस्वातंत्र्य जरी असलं तरी, आपल्या बोलण्याने इतरांना त्रास होईल आणि अपमान होईल असे बोलणे टाळणे आवश्यक असते मात्र ही बंधने ही या दोन्ही क्षेत्राने तोडून मोडून टाकलेली आहेत. या दोन्ही ग्लॅमरस क्षेत्राचे दुसरी बाजू चित्रपट नाटक मालिका या माध्यमातून येत राहिलेली आहे.
त्यातला अविश्वास, फसवेपणा, शोषण, अन्याय हे आधीपासून चित्रपट नाटकातून दाखवण्यात आले आहेत, त्यांची उदाहरणे इथे देण्याची गरज नाही. मात्र सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, ज्या काही चित्रपट, मालिका का सादर होतात त्यात भरपूर मालमसाला आणि प्रेक्षकांपर्यंत तात्काळ पोहचुन करुन प्रतिसाद मिळविण्याचे सामर्थ्य आहे आणि याचा फायदा फायदा घेत मोठ्या प्रमाणात याचा वापर होतोय. पूर्वी संध्याकाळची दैनिक निघायची त्याच्या भडक शीर्षकावरुन पेपर उचलला जायचा, तसाच प्रकार इथेही दिसतो.
मात्र इथे नसलेले बंधन लक्षात घेऊन काहीही देण्यात येते आहे ही तशी गंभीर बाब आहे,पण लक्षात कोण घेतो? असो तर विषय आहे ‘रानबाजार’ ओटीटी मालिकेचा. ए ग्रेड असला तरी लहान मुलांपासून सर्वच जण ही सहज पाहू शकतात. या नावावरुन लेखक दिग्दर्शक निर्माते यांना कोणाबद्दल बोलायचे ते कळते. त्या बाजारातील महिला, त्याचे आयुष्य, हे नवीन नाही. त्यावरही सिनेमे आलेत. मात्र आपल्या मालिकेतून त्या स्त्रियांचा आवाज होताना प्रसिध्दीसाठी जो मसाला परोसलाय त्याकडे कुणाचेही लक्ष वेधून घेतले जाते. कपडे उतरवणारी शिव्या देणारी नायिका तशी नवीन नाहीच, पण ती अगदी हातोहाती मोबाईल वर पाहाता येते, तो थ्रिल या नामवंत कलाकाराकडून सादर होताना अनुभवणे हे खूप महत्वपूर्ण ठरतं! ‘रानबाजार’ खूप चर्चेत आहे ती भडक व भेदकपणाने. यातील अभिनेत्रीचे चेहर्यासह आलेले जाहिरातीचे छोटे विडिओ अगदी रसिकतेने पाहिले गेले. काहींनी नावं ठेवली.
मुळात विषय असा की, ही कला आहे आणि कलावंत भूमिका सादर करतो त्यात पैसा, अभिनय गरज हे दोन्ही येतच! यात रानबाजार चे निर्माता दिग्दर्शक यशस्वी झालेत. राजकारणात समोर घडत त्याहून खूप काही मागे घडत असते. त्यात पैसा, बाई सगळच आलं. ‘रानबाजार’ ने खूप काही वेगळ केलेलं नाही. मात्र यातील अभिनेत्रीचे कौतुक करायला हवेच. मात्र तरीही या ओटिटी माध्यमाला मर्यादा रेषा हवी आहे हे नक्की. अभद्रता ही आपल्या समजण्यावर असते. मात्र तिचा अतिरेक होतो तेव्हा ती समाजाला घातकच ठरते, समाज माध्यमातून जी काही वल्गर, नीच पातळीवर अभिव्यक्ती होताना दिसते ती समाजाला कोणत्या दिशेला नेत आहे याचा विचार निश्चितच व्हायला हवा. राजकीय स्वार्थासाठी प्रत्यक्षात महिलांची बदनामी करणे हे तर या ओटिटीहून जास्त घातक आहे.
केतकी चितळेचे उदाहरण घ्या! ती काय बोलते, कुणाबद्दल बोलते याचं भान तिला नाही, तीला अपस्मार आजार आहे, तिच्यावर मानसिक उपचार करण्यात यावेत, हे महत्त्वाच,अशा मानसिक व्यंग असणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे, राजकारणात व मनोरंजनातही लक्ष्य एकच… कुणाला तरी संपवणं, चित्रपट माध्यमाचाही असाच वापर वाढलाय, सरकारने अशा विषयांवर तातडीने नियंत्रण आणणे आवश्यक आहे. सामुहिक गिधाडीपणा वाढलाय, तो तर प्रचंड घातक आहे. जात,धर्म, लिंग आदी अनेक प्रकार या लिंचिगमधे दिसतात यात भरडले जातेय स्त्री, समानतेच्य गप्पा कितीही हाणल्या तरी पैसे, नाव मिळवण्यास लागते स्त्रीच, तर दुसरीकडे स्त्रीपणाचा दुरुपयोग करणाऱ्यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे, बाजार कोणताही असो विक्री महत्वपूर्ण, पण हे करताना समाजाचे भान, स्त्रीचा सन्मान आवश्यक आहे हे विसरुन चालणार नाही.